रब्बी हंगामासाठी मका लागवड – शाश्वत पर्याय.

मका पिकाची बाजारपेठेत वाढलेली मागणी आणि स्थिर असलेले बाजारभाव यामुळे मागिल काही वर्षांत मका पिक हे शेतकऱ्यांच मुख्य पिक झालंय असं म्हणायला हरकत नाही. मका पासून तयार होणारे विविध पशुखाद्य तसेच इथेनॉल व स्टार्च निर्मिती मुळे देखील मकाची मागणी वाढतच आहे. मका पिकाचा चारा देखील पशुसंवर्धनासाठी महत्वाचा आहे. पण खरीप हंगामात पावसाचे पाणी उपलब्ध असते म्हणून लाखो हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करतात. तुलनेने रब्बी हंगामात मका लागवड तशी कमीच होते. पण खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात मका पिकाचे हेक्टरी उत्पादन ५- १० क्विंटलने अधीक येते. या वर्षी परतीचा पाऊस अतिवृष्टी होऊन बरसला. त्यामुळे रब्बी हंगामात पिकाला शेवटपर्यंत पाणी उपलब्ध राहील. कांदा रोपवाटिका परतीच्या पावसाने खराब झाल्यामुळे आणि पाणी चांगलं उपलब्ध असल्यामुळे पिक बदलासाठी रब्बी मका हा पर्याय म्हणून निवडन फायदेशीर ठरेल.

रब्बी हंगामातील मका लागवडीचे फायदे

  1. रब्बी हंगामात थंड वातावरणामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असतो. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च वाचतो.
  2. रब्बी हंगामात तापमान संतुलित असल्यामुळे मक्याच्या झाडांची वाढ संथ व दाणे भरगच्च येतात.
  3. अनेक भागांत रब्बी हंगामात विहिरी, बंधारे, ठिबक व्यवस्था यामुळे सिंचनाची सोय होते. त्यामुळे मका पिकाला नियमित पाणीपुरवठा मिळतो.
  4. खरीपातील मक्याचे उत्पादन बाजारात भरपूर येते, पण रब्बी हंगामातील मका तुलनेने कमी प्रमाणात येतो, त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो.
  5. खरीपात सोयाबीन, बाजरी, उडीद घेतल्यावर रब्बीमध्ये मका घेतल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते व कीड-रोगांच चक्र तुटतं लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान
    रब्बी मक्यासाठी मध्यम ते भारी काळी जमीन, गाळयुक्त किंवा चांगली पाणी धारण करणारी जमीन उत्तम ठरते.
    जमिनीचा pH 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.
    रब्बी मक्याला 20°C ते 30°C तापमान अनुकूल असते. थंडीचा अतिरेक (10°C खाली) पिकास मानवत नाही.
    लागवडीची वेळ
    रब्बी मक्याची लागवड ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
    उशिरा लागवड केल्यास दाणे भरभराटीला येण्यास उष्णता कमी पडते.
    बियाण्यांची निवड व प्रमाण
    रब्बी हंगामासाठी विद्यापिठाच्या वाणांसोबतच खाजगी कंपन्यांचे देखील उच्च उत्पादन देणारे अनेक वाण उपलब्ध आहेत.
    बियाण्याचे प्रमाण : 15–20 किलो प्रति हेक्टर

पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास,
थायरम हे बुरशीनाशक २ ते २.५ ग्रॅम प्रमाणे चोळावे.अॅझेंटोबक्टर (जिवाणू संवर्धक) २५ ग्रॅम किंवा १०० मिलि प्रति किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी.
जमीन तयारी व पेरणी पद्धत

जमिनीची दोन ते तीन नांगरट करून कुजलेले शेणखत (10 टन/हे.) टाकावे.
मग दोन खुरपणीनंतर सरी-वरंबा पद्धतीने पेरणी करावी.

सरीतील अंतर: 60 सेमी

टोकण यंत्राच्या साहाय्याने पेरणी करणे फायदेशीर ठरते.ठिबक सिंचनाचा वापर देखील सुलभ पद्धतीने करता येतो.

पाणी व्यवस्थापन

रब्बी मका पूर्णपणे सिंचित असावा.
महत्त्वाच्या टप्प्यांवर पाणी द्यावे –

  1. उगवणी नंतर
  2. गुच्छ निर्मिती (टॅसलिंग)
  3. फुलोऱ्याच्या वेळी
  4. दाणे भरण्याच्या अवस्थेत
    ठिबक पद्धतीने प्रत्येक झाडाच्या मुळाशी पाणी दिल्यास उत्पादन १५–२०% वाढते.
    खत व्यवस्थापन
    माती परीक्षणानुसार करून खतांचे प्रमाण ठरवावे.साधारणपणे पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र व ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र आणि उर्वरित ४० किलो
    नत्र पेरणीनंतर ४५ दिवसांनी द्यावी.
    सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास जमिनीची सुपीकता टिकते. कीड व रोग व्यवस्थापन
    कांड कीड: किटकनाशक क्लोरपायरीफॉस 2 मि.लि./ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    पर्णभक्षी अळी: स्पिनोसॅड 0.5 मि.लि./ली. पाणी फवारावे.
    तांबेरा व गंज रोग: मॅनकोझेब 2 ग्रॅम/ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    ▪️जैविक उपाय म्हणून ट्रायकोग्रामा किंवा बॅसिलस सबटॅलिस यांचा वापर करावा. रब्बी हंगामात मका लागवड केल्यास शेतकऱ्यांना स्थिर बाजारभाव, उत्कृष्ट दर्जाचे दाणे आणि चांगले उत्पादन मिळेल. योग्य पद्धतीने नियोजन, ठिबक सिंचन, संतुलित खत वापर आणि सुधारित वाणांची निवड यामुळे रब्बी मका शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर पर्याय ठरेल.
    श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top