‘वाचाल तर वाचाल’ही एक साधी म्हण नाही, तर आयुष्याचा अनुभव सांगणारा सत्य सूत्र आहे. माणसाचे विचार, संस्कार, दृष्टिकोन आणि यश याची पायाभरणी वाचनातूनच होते. वाचन ही केवळ अक्षरे ओळखण्याची कला नाही, ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची आणि जगाला समजून घेण्याची प्रक्रिया आहे.
वाचन म्हणजे विचारांचा प्रवास
जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, तेव्हा आपले विचार त्या पुस्तकाच्या पानांतून प्रवास करतात. आपण लेखकाच्या जगात फिरतो, त्याच्या अनुभूती अनुभवतो, आणि नकळत आपल्या मनात नवे विचार जन्म घेतात.
बालपणीच्या गोष्टींपासून ते विज्ञान, साहित्य, आत्मचरित्रे, इतिहास किंवा कथा कादंबऱ्या … प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवे शिकवत असते..
एकदा महान वैज्ञानिक आइन्स्टाईन यांना विचारले गेले, “आपला बुद्धिमत्ता विकास कसा झाला?”
ते हसले आणि म्हणाले, “मी माझ्या आईकडून गोष्टी ऐकल्या, पुस्तकं वाचली, आणि कल्पनाशक्ती वापरली.”
म्हणून वाचन कल्पनाशक्तीला पंख देते, उडण्यासाठी आकाश मोकळं करते…
वाचनाने घडलेले महामानव…
आपल्या देशातील अनेक महामानवांचा यशाचा पाया वाचनात आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.. या सर्वांनी वाचनाच्या माध्यमातून स्वतःला आणि समाजाला नव्या दिशेने नेले.
महात्मा फुले यांचे सुप्रसिद्ध वचन आहे,” विद्येविना मती केली, मती विना नीती गेली, निती विना गती गेली, गती विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले…. ” यावरून आपल्याला समजते की वाचनाचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे.
डॉ. आंबेडकर रेल्वे स्टेशनवर बसून रात्री पुस्तकं वाचायचे. त्यांच्या जवळ प्रकाश नव्हता, पण ज्ञानाची भूक होती. त्यांनी जगातील अनेक विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आणि संविधान लिहिलं.
डॉ. अब्दुल कलाम यांनी तर बालपणी वर्तमानपत्रे वाटताना वाचनाची सवय लावली. ते म्हणायचे “वाचन हे माझं इंधन आहे. जसं रॉकेटला इंधन लागतं, तसं मनाला ज्ञानाचं इंधन लागतं.”
त्यांचा जन्मदिवस, १५ ऑक्टोबर, ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो, कारण ते स्वतः वाचनाच्या शक्तीचे उत्तम उदाहरण आहेत.
वाचन का आवश्यक आहे?
आजच्या डिजिटल युगात सगळं काही ‘शॉर्टकट’मध्ये मिळतं , विविध रील्स, व्हिडिओज, थंबनेल्स. पण या सगळ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता कमी होते.
वाचन आपल्याला शांतता, एकाग्रता आणि विवेक शिकवते.खरे ज्ञान वाचनातून मिळते.ते आपल्याला विचार करायला लावते. ज्याचं वाचन चांगलं, त्याची भाषा समृद्ध, विचार सुसंगत आणि व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासपूर्ण असतं.
वाचनामुळे मनाची समज वाढते,विचारांचा विस्तार होतो,
निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवता टिकते. म्हणून वाचन हे प्रत्येकाने केले पाहिजे. एखाद्या लेखकाचा 10-20 वर्षाचा अभ्यास तो जेव्हा एखाद्या पुस्तकात लिहितो आणि आपण एक दिवसात ते पुस्तक वाचतो, तेव्हा आपण त्या लेखकाचे १०-२० वर्षाचे आयुष्य जगलेले असतो.
काही ऐतिहासिक उदाहरणे-
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम वाचक होते. त्यांनी धार्मिक, युद्धनीती, अर्थशास्त्र अशा विषयांचे अभ्यासपूर्वक वाचन केले. म्हणूनच त्यांचं राज्यकारभार लोकशाही तत्त्वांवर उभं राहिलं.
छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा मोठे वाचक होते ,त्यांनी बुद्धभूषणम् यासारखी पुस्तके लिहिले आहेत.
वाचनाचे एका विनोदी उदाहरण…
एकदा शिक्षकाने विचारलं, “जर तुमच्याकडे दोन सफरचंद असतील आणि मी एक घेतला, तर तुमच्याकडे किती उरतील?” विद्यार्थी म्हणाला, “माझं सफरचंद तुम्हाला देणार नाही!”
सगळे हसले, पण शिक्षक म्हणाले, “बघा, वाचनाने फक्त उत्तरच नाही, विचार करण्याची पद्धतही बदलते.”
ज्याने वाचनाची सवय लावली, त्याचं आयुष्य बदलतं.
वाचन म्हणजे आपल्या मेंदूचा व्यायाम. जसं शरीरासाठी व्यायाम आवश्यक असतो, तसंच मेंदूसाठी वाचन आवश्यक आहे.
दिवसातून १५ मिनिटे जरी आपण एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचलं, तरी ते १५ मिनिटं आपल्या जीवनाची दिशा ठरवू शकतात. ज्याला वाचनाची गोडी लागते, त्याला कंटाळा, नैराश्य किंवा एकटेपणा कधी जाणवत नाही, कारण त्याचं मन विचारांनी सदैव जिवंत असतं.
समाजाला वाचनाची गरज…
आज शाळांमध्ये वाचनालयं आहेत, पण त्यात बसणारे विद्यार्थी कमी होत चालले आहेत. मोबाईल, गेम्स, सोशल मीडियामध्ये मुलं हरवत आहेत. जर प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला गृहपाठ व्यतिरिक्त दररोज १५ मिनिटे वाचनाची सवय लावली, तर ती मुलं केवळ हुशार नाही, तर सुसंस्कृत नागरिक म्हणून घडतील.
वाचन केवळ शालेय जीवनापुरतं मर्यादित नाही;
ते शेतकऱ्याला नवे तंत्रज्ञान शिकवतं,
अधिकाऱ्याला जनतेशी संवाद शिकवतं,
आणि सामान्य माणसाला जगण्याचं नवं तत्त्वज्ञान देतं. आज व्हाट्सअप विद्यापीठामुळे खरं काय आणि खोटं काय हा खूप मोठा प्रश्न पडला आहे. एखादी चुकीची माहिती भरभर पसरते व फार मोठा अनर्थ घडू शकतो. म्हणून सोशल मीडियावर फार विसंबून राहू नये वाचनाची सवय अंगीकारावी.
डॉ. अब्दुल कलाम म्हणायचे “Dream is not that which you see while sleeping,
Dream is that which does not let you sleep.”
हे स्वप्न साकार करण्याचं साधन म्हणजे वाचन.
वाचनातूनच विचार जन्म घेतात, विचारांमधून कृती होते आणि कृतीतून यश मिळतं. म्हणून चला, आज वाचन प्रेरणा दिनी आपण ठरवू या —
दररोज काहीतरी नवीन वाचायचं,
मुलांना पुस्तकांची गोडी लावायची,
आणि स्वतःचं जीवन ज्ञानाने उजळायचं. कारण …
“वाचन हीच खरी शक्ती आहे, आणि पुस्तक हेच सर्वश्रेष्ठ गुरु आहेत!”
सर्व वाचकांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तथा वाचन प्रेरणा दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…