काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता : शेत रस्त्यांचे महत्व


काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता…”


परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेतून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे वर्णन आढळते. त्या कवितेतील शब्द केवळ काव्य नसून, ग्रामीण जीवनाचे वास्तव सांगणारे सत्य आहेत. शेतकरी हा आपल्या आयुष्याचा बहुतेक काळ शेतामध्ये घालवतो. परंतु शेतापर्यंत पोहोचण्यासाठी जर योग्य रस्ता नसेल तर शेतकऱ्याची वाट काट्याकुट्याचीच ठरते.

आज ग्रामीण भागात शेत रस्ते ही शेती विकासासाठीची सर्वात महत्त्वाची कडी आहे. पक्के आणि सुयोग्य रस्ते असतील तर शेतकरी कोणत्याही ऋतूत, कोणत्याही वेळी शेतात जाऊन आपले काम करू शकतो. परंतु वास्तवात अनेक गावांमध्ये अजूनही शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते, चिखलमय पायवाटा किंवा काट्याकुट्याचे रस्तेच उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त होतो, पीक उत्पादन मर्यादित राहते आणि शेवटी शेतकऱ्याचा आर्थिक विकास थांबतो.

शेत रस्ते : शेतीचे प्राणवायू

शेती ही केवळ बी पेरून, पाणी देऊन उभी राहात नाही. पिकाला वेळोवेळी खत, औषधे, मजूर, मशागत साधने, यंत्रसामग्री यांची गरज भासते. हे सर्व योग्य वेळी शेतात पोहोचवण्यासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असते. शेतातून निघणारा माल बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक सुलभ असणे गरजेचे आहे.

वाहतुकीसाठी सोय: पिकलेला माल शेतातून बाजारपेठेत नेण्याकरिता पक्के रस्ते नसतील तर पावसाळ्यात किंवा चिखलमय अवस्थेत माल रस्त्यातच खराब होतो. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: ट्रॅक्टर, पंपसेट, स्प्रे पंप, पीककापणी यंत्र ही साधने वापरायची असतील तर त्यांना ने-आन करण्यासाठी पक्का रस्ता असणे आवश्यक आहे.

फळबाग आणि भाजीपाला उत्पादन: केळी, पपई, द्राक्षे, भाजीपाला यांसारख्या नफ्याच्या पिकांकडे शेतकरी वळत नाही, कारण त्यांची वाहतूक वेळेवर करता येत नाही. परिणामी सिंचन असले तरीही शेतकरी सोयाबीन, कापूस अशा पारंपरिक पिकांवरच समाधान मानतो.

रस्त्याअभावी निर्माण होणाऱ्या समस्या

  1. पावसाळ्यातील अडचणी: पावसाळ्यात शेत रस्ते चिखलमय होतात. बायाबापुड्या जनावरांसह शेतात जाताना शेतकरी अक्षरशः चिखल तुडवत जाण्यास भाग पडतो
  2. शारीरिक श्रमांचा अपव्यय: योग्य रस्ता नसल्यामुळे शेतात जाण्याआधीच ऊर्जा व वेळ खर्च होतो.
  3. युवकांचा शेतीकडे न वळणे: आज अनेक युवक शेतीकडे पाठ फिरवतात. त्यांना वाटते – “शेतात जायला रस्ता नाही, मग शेती कशी करायची?” हा विचार ग्रामीण भागासाठी धोकादायक आहे.
  4. वादविवाद: पांदण रस्ते योजना असली तरी शेतकरी आपली जमीन द्यायला तयार नसतात. त्यामुळे शेत रस्त्यांच्या कामात अनेकदा वादविवाद होतात आणि समस्या अधिक बिकट होते.

शासनाच्या योजना आणि त्यांची मर्यादा
शासनाने पांदण रस्ते योजना राबवली आहे. पण ही योजना मर्यादित स्वरूपात आहे. अनेकदा निधी अपुरा पडतो, जागेचे वाद निर्माण होतात आणि रस्त्यांचे काम अपूर्ण राहते.
तथापि, शेततळे, हरितगृह, शेडनेट, संरक्षित शेती यांसारख्या योजनांचा खरा फायदा घ्यायचा असेल तर चांगले शेत रस्ते आवश्यक आहेत. पक्के रस्ते असतील तर या योजनांमधून मिळणारे उत्पादन शेतातून सहज बाजारात नेता येते.

उज्ज्वल भविष्याची किल्ली : पक्के शेत रस्ते
जर प्रत्येक गावातील शेतरस्ते मजबूत आणि पक्के झाले तर अनेक बदल घडून येतील –
सिंचन असलेले शेतकरी केळी, भाजीपाला, फळबाग यांसारख्या नफ्याच्या पिकांकडे वळतील.
वाहतुकीची सोय झाल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वेगाने वाढेल.
शेतीकडे पाठ फिरवणारे युवक पुन्हा शेतीकडे आकर्षित होतील.
ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर थांबेल.
शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारतील आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील.

शेतीकडे वळण्यासाठी –
शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याच्या घामाच्या थेंबावर देशाचे भविष्य उभे आहे. परंतु त्या शेतकऱ्याला जर शेतापर्यंत पोहोचण्याचा रस्ता नसेल, तर त्याची मेहनत वाया जाते. म्हणूनच आज प्रत्येक गावाने, प्रत्येक समाजाने, आणि शासनाने शेत रस्त्याच्या प्रश्नाला गांभीर्याने घेतले पाहिजे.

“काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता” ही केवळ कविता राहू नये, तर शेतकऱ्याच्या जीवनातून तो काट्याकुटा दूर व्हावा, पक्के रस्ते उभे राहावेत आणि शेतकरी खऱ्या अर्थाने सुखवस्तू व्हावा – हेच आजचे खरे ध्येय असले पाहिजे.

शेत रस्ते हे फक्त मातीचे किंवा डांबरी मार्ग नसून ते शेतकऱ्याच्या प्रगतीचा महामार्ग आहेत. जर आपण खेड्याच्या पायवाटांना पक्क्या रस्त्यांमध्ये बदलले, तर शेतकऱ्याचा हात बळकट होईल, गाव समृद्ध होईल आणि भारत खऱ्या अर्थाने संपन्न होईल.

3MinForMahaFarmers

2 thoughts on “काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता : शेत रस्त्यांचे महत्व”

  1. Dnyaneshwar mapari

    खरोखरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक ज्वलंत प्रश्न जगासमोर मांडणारा हा अप्रतिम लेख आहे……

  2. Sharad D Nilkanthwar

    आवटे जी आपला लेख आवडला..
    आपल्या मराठावड्याचे कवी इंद्रजित भालेराव सराच्या ओळी.. त्यातून ग्रामीण भागातील शेतरस्ते खरंच काट्या कुट्या चा रस्ता गावाकडं चल माझ्या दोस्ता….
    पांदन रस्ते आता कुठे मोकळा श्वास घेत आहे..
    जबरदस्त 👍🌹💐💐

Leave a Reply

Scroll to Top