वाचाल तर वाचाल शेतीतही…

आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण एका वेगळ्याच जगात जगतो .. व्हर्च्युअल जगात. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्यांमुळे माहितीचा मोठा स्फोट झाला आहे. पण या माहितीच्या महासागरात खरी, अचूक आणि उपयुक्त माहिती शोधणे ही खरी कसोटी आहे.
शेतकरी असो वा विद्यार्थी, अधिकारी असो वा व्यापारी , जो वाचतो तो सुधारतो जो वाचतो, तोच पुढे जातो.

सोशल मीडियाचा प्रभाव आणि वाचनाची कमतरता

आजकाल प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मोबाईल आपल्या हातातून सुटत नाही. पण आपण त्याचा उपयोग नेमका कशासाठी करतो आहोत….?
रिल्स, व्हिडिओ, मनोरंजन, आणि मेम्स यामध्ये आपण इतके गुंतलो आहोत की वाचन या सवयीपासून दूर गेलो आहोत.
पण लक्षात ठेवा : शॉर्टकट ज्ञान देत नाही, तो फक्त भ्रम निर्माण करतो. वाचन म्हणजे विचारांना चालना देणारा प्रवास. सोशल मीडियावरील माहिती तात्पुरती आनंद देते, पण सखोल लेखन आपल्याला विचार करायला लावते, निर्णय घ्यायला शिकवते आणि आपल्या जीवनाचा दर्जा उंचावते. म्हणून दर्जेदार वाचन हे आपल्या बुद्धीचे खाद्य आहे.

शेती क्षेत्रात वाचनाचे महत्त्व काय…
शेती ही आज फक्त निसर्गावर अवलंबून राहिलेली प्रक्रिया नाही. आज शेती ही ज्ञानावर आधारित शास्त्र बनली आहे.
शेतकऱ्यांनी जर आपले भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर त्यांना खालील गोष्टी वाचून समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे….

  1. नवीन बियाण्यांचे संशोधन-
    दरवर्षी नवी सुधारित वाणं उपलब्ध होत आहेत. ती वाणं कशी आहेत, त्यांचे उत्पादन किती आहे, रोगप्रतिकारक शक्ती किती आहे, हे समजून घेतल्यास शेतकरी योग्य निर्णय घेऊ शकतो. नवनवीन संशोधन वाचन केल्यामुळे आपल्या ध्यानात भर पडते.
  2. किड-रोग व्यवस्थापन:
    दरवर्षी नव्या कीड व रोगांचे प्रमाण वाढत आहे. नवीन औषधे, जैविक नियंत्रण पद्धती, आणि सेंद्रिय उपाय याविषयी वाचले, तर शेतकरी अनावश्यक खर्च टाळू शकतो. बाजारात नवनवीन कीटकनाशकाचे आगमन झाले आहे वेगवेगळे रसायने आली आहेत त्यांचा अभ्यास होतो.
  3. सूक्ष्म सिंचन आणि आधुनिक लागवड पद्धती:
    पाण्याची बचत करत उत्पादन वाढवण्यासाठी ठिबक, स्प्रिंकलर यांसारख्या पद्धतींचा योग्य उपयोग कसा करावा हे वाचनातून समजते.
  4. बाजारभाव आणि विपणन:
    आज बाजारात कोणत्या पिकाला किती दर आहे, कुठल्या बाजारात मागणी जास्त आहे — ही माहिती मोबाईलवरील ॲप्स आणि वेबसाईट्सवर सहज मिळते. पण त्या माहितीचा अभ्यास, विश्लेषण आणि योग्य वापर वाचनातूनच शक्य आहे. पुस्तकांचे आधुनिक रूप :मोबाईलवरील ज्ञान..

पूर्वी ज्ञानासाठी ग्रंथालये, वर्तमानपत्रे, मासिके हेच साधन होते. आता तीच पुस्तके आपल्या मोबाईलमध्ये आली आहेत.
“ई-बुक्स”, “ब्लॉग्स”, “ऑनलाइन लेख”, “कृषी विद्यापीठांचे पोर्टल्स” , ही सर्व ज्ञानाची खाण आहेत.
जर आपण रोज १० मिनिटे तरी दर्जेदार वाचनाला दिले, तर पुढील काही महिन्यांत आपल्या विचारांमध्ये, शेतीच्या निर्णयांमध्ये आणि आर्थिक प्रगतीत मोठा फरक दिसून येईल.

वाचनातून विचार, विचारातून कृती
वाचन हे फक्त माहिती मिळवणे नाही, तर विचारांना दिशा देणे आहे. एखादा शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे प्रयोग करून जी माहिती लेखाच्या स्वरूपात प्रकाशित करतो, ती माहिती आपण फक्त काही मिनिटे वाचून जाणून घेऊ शकतो ,हेच वाचनाचे सामर्थ्य आहे.

-उदाहरणार्थ, “माती परीक्षण” या विषयावर शेतकऱ्यांनी एक छोटा लेख वाचला तरी त्यातून योग्य खत व्यवस्थापनाची दिशा मिळू शकते.
-“बाजारभाव विश्लेषण” वाचले, तर विक्रीचे योग्य नियोजन करता येते.

  • “हवामान बदल” यावरील लेख वाचल्यास पिकांची निवड अधिक शास्त्रीय पद्धतीने करता येते. शेतकऱ्यांसाठी काही उपयुक्त वाचन स्रोत
  1. कृषी विद्यापीठांच्या वेबसाईट्स … जसे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इ.
  2. कृषीविषयक मोबाइल ॲप्स – महाविस्तार, कृतज्ञ, कृषि मित्र, eNAM इ.
  3. शेतकरी ब्लॉग्स आणि यूट्यूब चॅनेल्स – जसे कृषी वसंत, जेथे दर्जेदार व उपयुक्त माहिती दिली जाते
  4. सरकारी पोर्टल्स – mahadbt, mahakrishi, agmarknet.gov.in, mkisan.gov.in, pmfby.gov.in इत्यादी.
  5. ज्ञान — माणसाचा तिसरा डोळा आहे..
    ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं म्हटलं जातं, आणि ते खरं आहे. जो वाचतो, तो विचार करतो; जो विचार करतो, तो नवीन काहीतरी घडवतो. आजच्या युगात शेतकऱ्याने तंत्रज्ञान स्वीकारले नाही, तर तो मागे पडेल.
    पण ज्याने वाचनाची सवय लावली, तो शेतीतही शास्त्रज्ञासारखा विचार करणारा शेतकरी बनेल. “वाचाल तर वाचाल”
    शेतकरी बांधवांनो,
    तुमच्याकडे अमूल्य साधन आहे , तुमचा मोबाईल फोन.
    तो फक्त मनोरंजनासाठी नाही, तर ज्ञान मिळवण्यासाठी वापरा. दररोज थोडं वाचा – एक चांगला लेख, एक नवीन संशोधन, एक अनुभवकथा – आणि पाहा, तुमच्या शेतीत, विचारांमध्ये आणि जीवनात कसा बदल घडतो.

वाचन फक्त विद्यार्थ्यांनी करावा असं नसतं तर वाचन हे प्रत्येक लहान थोरांनी करणे आवश्यक आहे. वाचन हे खर्च नाही, ते गुंतवणूक आहे. आणि हीच गुंतवणूक शेतकरी बांधवांना आधुनिक, सक्षम आणि प्रगत शेतकरी बनवेल… चला तर… वाचण करुया…..

3MinForMahaFarmers

Leave a Reply

Scroll to Top