चला रब्बीसाठी सज्ज होऊ…


सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार..
अतिवृष्टी आणि महापुराने व्यापलेला खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. आपण सारे या मातीचे खरे वारसदार आहोत. शेती फक्त व्यवसाय नाही, तर ती आपली जीवनशैली आहे, आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनलेली संस्कृती आहे. हाक दिली की धावून येणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोण आहात? तुम्ही आहात या धरतीचे शूर योद्धे, निसर्गाच्या प्रत्येक आव्हानाला छातीचा कोट करून सामोरे जाणारे खरे बळीराजाचे वंशज आहोत…


यावर्षीचा खरीप हंगाम आपल्यासाठी किती कसोटीचा ठरला. डोळ्यादेखत पिकं पाण्याखाली गेली, वाहून गेली, अवकाळीने होत्याचं नव्हतं केलं. मनातल्या मनात साठवलेल्या स्वप्नांचा चिखल होताना पाहून तुमच्या काळजाचं पाणी झालं असेल. ते दुःख, ती वेदना अगदी ह्रदयापर्यंत पोहोचते आहे. एका क्षणात झालेलं ते प्रचंड नुकसान पाहताना, आपला धीर सुटणं साहजिक आहे.
पण, थांबा शेतकरी बांधवांनो…
किती दिवस आपण त्या गेलेल्या दिवसांचं, त्या झालेल्या नुकसानीचं दुःख कवटाळून बसणार आहोत.. ? शेतकरी कधीही हरत नाही, तो फक्त क्षणभर थांबतो. शेतीत नुकसान होणं, हे नवीन नाही आपल्याला लहानपणापासूनच या चढ-उताराची सवय झाली आहे.
निसर्गाची माया अशीच असते. कधी तो भरभरून देतो, तर कधी अचानक हिरावून घेतो. पण याच चढ-उतारांवर मात करून पुन्हा नव्या उत्साहाने उभा राहतो, तोच खरा शेतकरी..

आपल्याला थांबायचं नाहीच, आता रडत बसून किंवा निराश होऊन चालणार नाही. कारण, समोर बघा, रब्बी हंगाम आपल्या दारावर उभा आहे. नवीन संधी घेऊन, नवी आशा घेऊन तो आपल्याला साद घालतोय. आपल्या हातात अजूनही वेळ आहे, अजूनही बळ आहे, आणि आपल्यासोबत आहे आपली जिद्द….पुन्हा लढायचं. ही तर आपली ओळख आहे.

संघर्षातून उभा राहणं ही तर आपल्या जन्मजात मिळालेली देणगी आहे. आपण लढवय्ये आहोत. हजारो वर्षांची परंपरा आहे आपली. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट… काय काय पाहिलं नाही आपण? पण कधी माघार घेतली नाही. प्रत्येक वेळी या मातीशी असलेलं नातं अधिक घट्ट करत आपण पुन्हा जोमाने उभे राहिलो. आता याच जिद्दीची गरज आहे. झालेलं नुकसान मागे सारून, डोळ्यांत नवं स्वप्न घेऊन आपल्याला रब्बीच्या तयारीला लागावं लागेल. खरीप हंगामात झालेल्या चुकांमधून शिकायचं आहे. जुन्या दुःखाला विसरून, नवीन उत्साहाने आणि नव्या ऊर्जेने आपल्याला या हंगामात मेहनत करायची आहे. या हंगामात आपलं उत्पादन वाढवून मागच्या नुकसानीची भरपाई करायची आहे.
तुम्ही निराश होऊ नका. तुमचं दुःख मोठं आहे, पण तुमची हिंमत त्याहून मोठी आहे. तुमचं मनगट खूप मजबूत आहे.
नियोजन आणि तंत्रज्ञानाची कास धरून यापुढे फक्त बळावर नाही, तर बुद्धीच्या जोरावर आपल्याला लढायचं आहे.

१. जमिनीनुसार खत व्यवस्थापन…
माझी जमीन काय बोलते आहे, हे आपल्याला ऐकावं लागेल. माती परीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्या पिकासाठी कोणतं खत किती प्रमाणात वापरायचं, हे माती परीक्षणामुळे अचूक कळेल. यामुळे अनावश्यक खतांवर होणारा खर्च वाचेल आणि पीक निरोगी वाढेल. शास्त्रीय आधाराशिवाय शेती नाही म्हणून माती परीक्षण करून घ्यावे.


२. “जशी लग्ना पूर्वी हळद, तशी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया” हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा. बीज प्रक्रिया शंभर टक्के झाले पहिजे. बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते ,पीक रोगमुक्त राहते व पर्यायाने उत्पादनात वाढ होते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करूनच आपल्या पिकाची पेरणी करावी.


३. आधुनिक तंत्रज्ञान आणि वाणांची निवड-
फक्त पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. सुधारित बियाणं, कमी पाण्यावर येणारे वाण आणि पाण्याची बचत करणाऱ्या सिंचन पद्धती (ठिबक, तुषार) यांचा वापर वाढवा. इंटरनेटवर, कृषी विभागाच्या संकेतस्थळांवर आणि कृषी विद्यापीठांमध्ये अनेक नवीन माहिती आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ते आत्मसात करा. ज्ञानाची कास धरा. महाराष्ट्र शासन कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार एआय या नावाने ॲप आणले आहे जे कृषी चे चालते बोलते विद्यापीठ आहे त्याचे अवलोकन करून वापर करा.

४. पीक फेरपालट आणि बाजारपेठेचा अभ्यास-
आपले जुने माणसं सांगतात की पिकाची फेरपालट आवश्यक आहे. एकाच प्रकारची पीक घेण्याऐवजी पीक फेरपालट करा. यामुळे जमिनीची सुपिकता टिकून राहील आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. कोणते पीक घेण्यापूर्वी, त्याच्या बाजारभावाचा अभ्यास करा. मागणी कोणत्या पिकाला जास्त आहे, हे पाहून पेरणीचा निर्णय घ्या.

आपल्यासोबत आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग….
माझ्या शेतकरी बांधवांनो, या संघर्षात तुम्ही एकटे नाहीत. आपले महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्या मदतीला खंबीरपणे उभा आहे.
खरीप हंगामात झालेल्या नुकसानीनंतर सरकारने निश्चितच मदतीचा हात पुढे केला आहे. पण त्याही पलीकडे जाऊन, रब्बी हंगामासाठी कृषी विभाग आपल्याला अनेक प्रकारे मदत करण्यास सज्ज आहे.

शासनाचा कृषी विभाग तुमचा मार्गदर्शक आणि मित्र आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, गावात कृषी कर्मचारी आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून शेतकरी चर्चासत्र, सभेमध्ये सहभागी व्हा .आपल्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांच्या मदतीने रब्बी हंगामाची तयारी करा.

बांधवांनो, तुमचं सामर्थ्य तुमच्या घामात आहे, तुमच्या चिखलाने माखलेल्या हातांमध्ये आहे, आणि तुमच्या अखंड परिश्रमात आहे. शेतकरी हा फक्त पीक पिकवणारा नाही, तो या देशाचा आत्मसन्मान आहे. तुम्ही थकलात तर हा देश थांबेल.. म्हणून, आता दुःख बाजूला ठेवा. डोळ्यांत आलेलं पाणी पुसून टाका. तुमची उर्मी, तुमची जिद्द अजून संपलेली नाही. तुमच्या कष्टाची किंमत ही निसर्गाच्या कोणत्याही आपत्तीपेक्षा खूप मोठी आहे. संघर्ष हा तुमच्या जन्मजात पुजलेला आहे. तो तुमचा वारसा आहे.
या क्षणापासून निर्धार करा, मी रब्बी हंगामात इतकी मेहनत करेन की, गेलेले दिवस विसरून जाईन.
उद्याची सकाळ नवी आशा घेऊन उगवेल. ती सकाळ आपल्या शेतातील हिरवीगार पिके आणि समृद्धी घेऊन येईल. या मातीचे तुम्ही खरे योद्धा आहात.कारण शेतकऱ्याचा जन्मच हा ढगांच्या गडगडाटात झालेला असतो…..
शेवटी कुसुमाग्रजांच्या ओळी आपल्याला नक्कीच प्रेरणा देतात
“मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून ,फक्त लढ म्हणा…”

3MinForMahaFarmers

Leave a Reply

Scroll to Top